पूजा अगरवाल यांनी जागतिक नेमबाजी पॅरा क्रीडा विश्वचषक स्पर्धेत पटकावली दोन रौप्य पदके
चेन्नई : शार्प पॅराशूटर पूजा अगरवाल यांनी पेरू देशातील लिमा येथे झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरा क्रीडा विश्वचषक स्पर्धेत भरीव यश प्राप्त केले आहे. या विश्वचषक स्पर्धेत पूजा यांनी दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. पूजा या इंडियन बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात.
पूर्णत्व शुटींग अॅकॅडमीतल्या डॉ.करणी सिंग शुटींग रेंज मध्ये त्या नेमबाजीचा सराव आणि प्रशिक्षण घेतात. स्पोर्ट्स क्राफ्ट(दिल्ली) येथील प्रशिक्षक सुभाष राणा यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पॅरा पिस्तुल नेमबाजी स्पर्धेसाठीचे प्रशिक्षण घेतले.
पस्तीस वर्षीय पूजा यांना २०१२ मध्ये एका दुर्देवी अपघाताला सामोरे जावे लागले आणि त्यात त्यांना अपंगत्व आले. २०१४ मध्ये त्यांनी बँकेत काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर २०१६ मध्ये नेमबाजीला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांचा प्रेरणादायी प्रवास अखंड सुरु आहे. ‘पूजा अगरवाल पीक्रिएशन्स’ या चॅनेल द्वारे इतर दिव्यांग व्यक्तींना सगळ्या आव्हानांवर मात करून आणि स्वतःच्या दैनंदिन कामांना मुरड न घालता स्वतःची महत्वाची कामे कौशल्याने पूर्ण करण्यासाठी त्या प्रबोधन आणि प्रोत्साहन देतात.
पूजा अगरवाल १० मीटर एअर पिस्तुल मध्ये नेमबाजी करतात. पॅरा शूटर्स मध्ये जगात त्या १२ व्या आणि आशिया मध्ये ११ व्या स्थानांवर आहेत. २०१७ मध्ये पूजा यांनी संयुक्त अरब अमीराती मधील अल आईन येथे झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरा क्रीडा विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले.
पूजा अगरवाल म्हणाल्या, “जागतिक नेमबाजी पॅरा क्रीडा विश्वचषक स्पर्धेत दोन रौप्यपदके मिळविल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. माझा हात कमजोर असला तरी परिस्थितीचा मुकाबला करायला आणि एक स्वतंत्र आयुष्य जगायला मी शिकले आहे. महामारीच्या सध्याच्या काळात माझ्या यूट्यूब व्हिडिओंच्या माध्यमातून इतर दिव्यांग व्यक्तींना साधे सर्वसाधारण जीवन व्यतीत करता यावे यासाठी त्यांचे प्रबोधन आणि त्यांना पाठबळ देण्याचे काम मी करत आहे. माझ्या स्वप्नांना भरारी दिल्याबद्दल मी इंडियन बँकेची विशेष आभारी आहे.
इंडियन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पद्मजा चुन्दुरु म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आपल्या दैदिप्यमान कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पूजा अगरवाल आमच्या बरोबर असण्याचा आम्हांला प्रचंड अभिमान आहे.
