महाराष्ट्रात आचार्य अत्रे उपेक्षित राहिले ही शोकांतिका – उल्हास पवार

पुणेः- आचार्य अत्रे यांनी अनेकदा भूमिका घेतल्या. ते फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे पाईक मानत होते. मी पुण्याचा अत्रे असलो, तरी मी सदाशिव पेठेतला अत्रे नसून मी गंजपेठेतला अत्रे आहे, असे ते अभिमानाने जाहीररित्या सांगत असत. परंतू, त्यांच्या या जाहीर भूमिकेमुळे विचारधारा मानणारे आणि विरोधी विचारधारा असणा-यांकडून देखील ते स्वीकारले गेले नाही आणि ते उभ्या महाराष्ट्रात उपेक्षित राहिले ही शोकांतिका आहे, असे उदगार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले. 

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार  2020 या वर्षासाठी साहित्यीक पुरस्कार वर्गवारीतून ज्येष्ठ साहित्यीक डाॅ. राजन खान, पत्रकार पुरस्कार वर्गवारीतून पत्रकार संजय आवटे यांना तर कलाकार  पुरस्कार वर्गवारीतून भाऊ कदम यांना तर 2021 साठी अनुक्रमे प्रा. मिलिंद जोशी, पत्रकार पराग करंदीकर आणि विनोदी कलाकार श्रेया बुगडे यांना आज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पवार बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत कोरोना संबंधित शासनाचे सर्व नियम पाळून हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

यावेळी व्यासपीठावर आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, पुरस्कारार्थी राजन खान, संजय आवटे, पराग करंदीकर, श्रेया बुगडे, प्रा. मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाऊ कदम यांच्या वतीने श्रेया बुगडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, पुण्यात आचार्य अत्रे यांचा जो पुतळा आहे,तो दुर्लक्षित आहे. अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुण्यात व्हावे आणि अत्रेंचे साहित्य, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची विचारधारा समजून घेण्याची प्रक्रीया पुन्हा एकदा सुरू व्हावी. अत्रेंच्या विनोदात केवळ हास्य नव्हते, तर त्या हास्यामागे वेदना लपलेली असायची. अत्रेंसारख्या महान साहित्यिकाला महाराष्ट्र विसरला ही एक शोकांतिका आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, विसाव्या शतकातल्या पहिल्या  पन्नास वर्षांवर  आचार्य अत्रे हे  यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाम मुद्रा उमटलेली आहे. अत्रे साधूत्वाचे पूजक होतें.लेखणी आणि वाणी ही शब्द शक्तींची दोन ही रूपे त्यांच्यावर प्रसन्न होती.जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यांनी त्याज्य मानले नाही. साहित्याच्या आणि समाज जीवनाच्या ज्या ज्या प्रवाहात  आचार्य अत्रे  शिरले, त्या त्या प्रवाहात त्यांनीअत्रे  तरंग निर्माण केले. अत्र्यांच्या व्यक्तीमत्वात भक्ती शक्ती योगाचा संगम होतो. भक्ती योगामुळे त्यांनी आयुष्यभर चांगुलपणाची माधुकरी मागितली आणि शक्ती योगामुळे समाजाच्या प्रकृतीची हेळसांड करणाऱ्या शक्ती विरोधात ते सर्व शक्तीनिशी उभे राहिले. अत्रेनी जगण्याच्या लढाईत विनोदाचा शस्त्र म्हणून वापर केला त्यामुळे अनेक जण घायाळ झाले. विनोद बुध्दीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की सगळ्या संकटाना हसत सामोरे जाता येते हा संदेश त्यांनी दिला. मराठी माणसांना आपल्या विनोदाने  खळखळून हसवत त्यांनी रसरशीत जीवनदृष्टी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: