पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज

पुणे – कोकण ते केरळदरम्यान द्रोणीय क्षेत्र कायम असल्याने; तसेच पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. आजपासून शहरात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आल्याने वीकएंद संपल्यावर स्वागत पावसाने होईल, असे सांगण्यात आले आहे.

पुढील तीन ते चार दिवस शहरालगत असलेल्या घाटमाथ्यावरही मुसळधार  पाऊस   अंदा व्यक्त करण्यात आला आहे. सहा जूनला पुण्यात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अद्याप शहरात पुरेसा पाऊस पडलेला नाही. येत्या आठवड्यात मात्र पावसाचा जोर वाढणार असून, पश्चिमी वाऱ्यांच्या वाढत्या वेगामुळे पाऊस बराच काळ सक्रिय राहील, असेही सांगण्यात आले आहे.
पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांतही पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मावळ परिसरातही पावसाचा जोर राहणार आहे. शहरात अद्याप मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला नसला, तरी मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस पडेल. दोन-तीन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढत जाईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

शहरात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेतली, तर पुणे केंद्रात ५५.२ मिलिमीटर, पाषाण केंद्रात ५९.४ मिमी आणि लोहगाव केंद्रात ११८.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

वीस जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला असून, १५ जूननंतर पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: