शिवस्वराज्य दिनाचे संकल्पक अमित गायकवाड यांचा विशेष सन्मान

पुणे : शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरा कराव, या संकल्पनेचे प्रवर्तक तसेच या दिवशी शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सर्वत्र उभारावी, या संकल्पनेचे प्रवर्तक अमित सुरेशराव गायकवाड यांनी ही संकल्पना ९ वर्षे अथक परिश्रम घेऊन प्रत्यक्षात साकारली, याबद्दल त्यांचा शिवरायांचे जगातील पहिले भव्य अश्वारुढ स्मारक व त्या स्मारकाचा भाग असलेल्या जगातील पहिल्या शिराज्याभिषेक शिल्पाची प्रतिकृती देऊन शिवरायांचे वंशज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आला.

श्रीमंत मालोजीराजे छत्रपती म्हणाले, शिवरायांवर किती प्रखर श्रध्दा असावी, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अमित गायकवाड. शिवजयंती १९ फेब्रुवारीचा वीर सरदार,  वीर मावळे यांच्या वंशजांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा, हेलीकॉप्टर पुष्पवृष्टी सोहळा, दिपावली पाडव्याचा दीपोत्सव सोहळा आणि आताचा हा शिवस्वराज्य दिन या अभिनव संकल्पना गायकवाडांनी गेली १० वर्षे कष्ट घेऊन प्रत्यक्षात साकारल्या. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

उदय सामंत म्हणाले, शिवजयंती १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ही संकल्पना गायकवाडांनी मला सांगितली, त्याक्षणी मी जाहिर केले की शिवराज्याभिषेक दिन आम्ही शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करणार आणि त्याचे परिपत्रक काढून आम्ही ६ जूनला तो साजरा सुध्दा केला. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणुन साजरा होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, गायकवाडांनी अभ्यासपूर्ण अभिनव संकल्पना देऊन पुन:श्च एकदा विजयाची गुढी महाराष्ट्राला दिली.
अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यकार्य तडीस नेण्यासाठी नवप्रेरणा, नवचैतन्य अणि लक्ष लक्ष हत्तींचे बळ या सत्काराने मिळाले आहे. ६ जून २०१३ रोजी सर्वप्रथम आम्ही शिवराज्याभिषेक दिन दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवस्वराज्य दिन म्हणून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा केला होता. तब्बल ९ वर्षे अविरत परिश्रम घेऊन या संकल्पनेचे आता लाखोंनी वाहक झालेत आणि आता यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शासकीय परिपत्रक काढून या संकल्पनेला मान्यता देऊन, आपआपल्या विभागात साजरा करुन या संकल्पनेवर सुवर्ण कळस चढवला आहे. यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, उदय सामंत या सर्वांचे मन:पूर्वक आभारी आहोत. 
ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी गेली ९ वर्षे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झटणा-या प्रत्येक स्वराज्यबांधवांना, माताभगिनींना, स्वराज्यघराण्यांना तसेच माझे वडिल स्वर्गीय सुरेशशेठ कृष्णाजीराव गायकवाड यांना हा सन्मान समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: