उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना यातूनच देशाला वैभवाचे दिवस- ह.भ.प.चारुदत्त आफळे

पुणे : आपण विविध पदांवर राहून समाजाची सेवा करताना समाजाचे रक्षण करण्याची वेळ आली तर माझी मनगटे ती पेलू शकतील, असे व्यायाम व उपासना प्रत्येकाने सुरु ठेवायला हवी. उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना या दोन खांबांवर देशाला वैभवाचे दिवस दाखविण्यासाठी व्रतनिष्ठ राहू, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांनी सांगितले.

भक्ती आणि शक्तीचा मिलाप साधणा-या विषयांवरील कीर्तनाद्वारे शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांच्या प्रबोधनाकरीता दुसरा कीर्तन महोत्सव न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजित करण्यात आला. त्यामध्ये चारुदत्त आफळे यांना दुस-या कीर्तन महर्षी पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

चारुदत्त आफळे म्हणाले, सज्जनांनी दुष्टांसाठी कर्दनकाळ आहोत, या तयारीने राहिलो तर लोककल्याण साधता येईल. उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना करुन संतांच्या ॠणातून उतराई होण्याचा किंचीतपणे आनंद मिळेल. त्याकरीता अभ्यास करा, प्रचार, प्रसार करा आणि देशाला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर न्या, असे आवाहनही त्यांनी केले.

प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर म्हणाले, सर्व समाज ज्ञानवंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे, यादृष्टीने जाधवर इस्टिटयूटस् वेगवेगळ्या घटकांसाठी उपक्रम राबविते. भागवत धर्माची पताका फडकवित राहिले पाहिजेत, याकरीता भक्ती व शक्तीचा मिलाप असलेला हा कीर्तन महोत्सव राबविण्यात आला. कीर्तनातील विषयांतून सर्वांना आताच्या काळात प्रेरणा मिळेल, त्यामुळे सर्वांनी कीर्तनांचा आनंद घ्यावा.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, मागील २५ वर्षांपासून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय व धार्मिक विषयांतील अनेक कार्यक्रम घेत आहे. चांगले मान्यवर विद्यार्थ्यांसमोर येतील, त्यावेळी विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करतील. यंदाचा कीर्तनमहर्षी पुरस्कार समाजप्रबोधनाचे काम करणा-या चारुदत्त आफळे यांना आम्ही प्रदान करीत आहोत.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि महावीरचक्र विजेते ब्रिगेडियर कुलदीप सिंह चाँदपुरी ( भारत -पाकिस्तान युद्ध १९७१ – लौंगेवाला) याविषयांवर कीर्तने चारुदत्त आफळे यांनी केली आहेत. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा विनामूल्य आनंद घेता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: