राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामामुळे आंबेगाव, कात्रज परिसरातील वीजपुरवठ्यामध्ये अडथळे

पुणे -कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र जेसीबीच्या खोदकामामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या जात असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणच्या सुमारे 16 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आठवड्यातून असे तीन ते चार वेळा प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरु करणे व तोडलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणची धावपळ होत आहे. खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान व ग्राहकांचा नाहक रोष महावितरणला सहन करावा लागत आहे. दरम्यान, या महामार्गासाठी महावितरणच्या भूमिगत उच्चदाब वीजवाहिन्या व इतर यंत्रणा स्थानांतरीत करण्याचे काम नॅशनल हायवेज अॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांनी करावयाचे असून त्यासाठी महावितरणकडून जुलै 2020 मध्येच अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. वीजयंत्रणा स्थानांतरीत करण्याचे काम पूर्ण झाल्यास वीजपुरवठ्यात अडथळे येणार नाहीत.

पद्मावती विभाग अंतर्गत कात्रज चौक ते नवले ब्रिजदरम्यान राष्ट्रीय महामार्गासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. सुमारे 5 किलोमीटर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने महावितरणच्या आठ उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या यापूर्वीच टाकण्यात आलेल्या आहेत. या वीजवाहिन्यांसह इतर यंत्रणेचे स्थानांतर करण्यासाठी महावितरणने नियमानुसार अंदाजपत्रक मंजूर करून ते मागीलवर्षी जुलैमध्ये एनएचएआयला दिले आहे. वारंवार पाठपुरावा तसेच बैठकांमध्ये निर्णय होऊन सुद्धा वीजयंत्रणा स्थानांतरीत करण्याबाबत एनएचएआयकडून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही. याउलट गेल्या सहा महिन्यांपासून जेसीबीद्वारे रस्ता रुंदीकरणाच्या खोदकामात आतापर्यंत 27 वेळा उच्चदाब वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. परिणामी कात्रज चौक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी, वंडर सिटी, भारती विहार, कात्रज डेअरी आदी परिसरातील सुमारे 16 वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत तीन उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या इनकमिंग व पाच आऊटगोईंग उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या आहेत. गेल्या आठ दिवसांत जेसीबीच्या खोदकामामध्ये तब्बल 5 ठिकाणी भूमिगत वाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महावितरणकडून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दि. 7 जून रोजी तक्रार देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: