fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि.11:- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘माय पुणे सेफ’ ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते .

माय पुणे सेफ ॲपची कार्यपध्दती
पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल यांचे दैनिक गस्तीसाठी “माय सेफ पुणे” ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या सहाय्याने पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध होण्याकरीता महत्वाचे ठिकाणी भेटी देवून किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देवून त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढुन माय सेफ पुणे ॲपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद होते. ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲप मध्ये उपलब्ध राहते. हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

बदली सॉफ्टवेअरबद्दल माहिती
बदली सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया परंतु पारदर्शकपणे मनासारखी बदली मिळण्यास मदत होणार आहे. या ॲपमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, त्यांचा कार्यकाळ इत्यादीबाबीची नोंद असणार आहे. पोलीस स्थानकामध्ये समान पोलीस कर्मचाऱ्याचे बदलीने वाटप करण्यास मदत होणार आहे. यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सादरीकरण करुन कार्यपध्दतीबाबतची माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading