शिवाजीनगरचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ करण्याबाबत नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्याकडून ठराव सादर

पुणे : शहरातील शिवाजीनगर भागाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असा करावा, अशी मागणी करणारा ठराव नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी पुणे महानगर महापालिकेत नुकताच सादर केला.

६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. त्या दिवशी शिवरायांना ‘छत्रपती’ ही पदवी प्राप्त झाली. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन व राष्ट्रीयतेचे प्रतीक मानले जाते. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने अधर्मी क्रूर मुघलांना पराजित करून १६७४ मध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, जगभरात त्यांच्याविषयी निस्सीम आदराची भावना आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी पुणे शहरातील प्रसिद्ध शिवाजीनगर भागाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असा करण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव समस्त शिवप्रेमी व पुणेकर नागरिकांची लोकभावना लक्षात घेऊन प्रा. एकबोटे यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला.

या ठरावाला स्थानिक आमदार व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, स्थानिक नगरसेविका व (प्रभाग समिती अध्यक्षा – शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय) निलिमा दत्तात्रय खाडे, नगरसेविका स्वाती अशोक लोखंडे यांचीही या ठरावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे. शिवाजीनगर भागाचा नामविस्तार तातडीने ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असा करण्यात यावा, हीच छत्रपती शिवाजी महाराजांना आपली आदरांजली असेल. सर्वच महापुरुषांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे मत नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी ठराव देताना व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: