Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री

मुंबई दि. २९: पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टरांनी  त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ही यावेळी  उपस्थित होते. या ऑनलाईन परिषदेसाठी २१ हजार ५०० डॉक्टर्सनी नोंदणी केली होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी खासगी डॉक्टर्समध्ये देखील कोविड संसर्गाची मोठ्या प्रमाणवर भीती होती, त्यांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती. परंतु आता या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ञ, मैदानात उतरले आहेत. कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही त्यामुळे पुढील काळात फॅमिली डॉक्टरवर मोठी जबाबदारी असणार आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पाहिले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. पूर्वीचा संसर्ग आणि सध्याचा संसर्ग यात फरक आहे. आताचा संसर्ग हा म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे पसरत असून त्याचा वेग खूप जास्त आहे. शिवाय रुग्णांवरही जास्त काळ उपचार करावे लागत आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading