शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंतराजे मावळे यांची निवड
पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंतराजे मावळे यांची २०२१-२६ च्या कार्यकालासाठी फेरनियुक्ती करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली, यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी शाहीर गणेश टोकेकर तर कार्याध्यक्षपदी प्रा. शाहीरा संगीता मावळे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी अरुणकुमार बाभूळगावकर तर सहसचिवपदी शाहीर महादेव जाधव यांची निवड झाली आहे. इतिहास अभ्यासक मोहन शेटे, माधवसिंह परदेशी, प्रा. रूपाली देशपांडे, सुरेश तरलगट्टी यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे. प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी चेतन हिंगे आणि व्यवस्थापकपदी शाहीर होनराज मावळे असणार आहेत.
शाहिरी व लोककलांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेपासून शाहीर हेमंतराजे मावळे कार्यरत आहेत.
चेतन हिंगे म्हणाले, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्यावतीने महाराष्ट्र स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण वर्ग, शाहीर हिंगे युवा कला गौरव पुरस्कार, पुणे कीर्तन महोत्सव, लोकशिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा असे विविध उपक्रम आणि स्पर्धा प्रबोधिनीच्या माध्यमातून अखंडितपणे राबविण्यात येत आहेत. तसेच समाजातील उपेक्षित घटक, विशेष मुलांसाठी आपली दिवाळी,आपली दहीहंडी असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
प्रबोधिनीच्या वतीने कोरोना काळात कलावंतांना मदत, शिधा वितरण, पूरग्रस्त कलावंतांसाठी संसारोपयोगी साहित्य वितरण, ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान असे उपक्रम सातत्याने राबविले जातात.
