टाटा पॉवरने पुण्यातील मुळशी येथील सार्वजनिक रुग्णालयांना दिला मदतीचा हात
पुणे – भारतातील सर्वात मोठी एकीकृत वीज कंपनी टाटा पॉवरने सध्या देशात सुरु असलेल्या कोविडविरोधातील लढाईत योगदान देत ४० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स पुण्यातील मुळशी येथील रुग्णालयांना दान केले आहेत. प्रत्येकी ४७ लिटर (७ क्युबिक) वजनाचे हे ऑक्सिजन सिलिंडर्स रुग्णालयांना सध्या भासत असलेली ऑक्सिजनची निकड पूर्ण करण्यात मोलाचे ठरतील. टाटा पॉवरच्या हायड्रो डिव्हिजनच्या टीमने महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात विधान भवन येथे हे सिलिंडर्स सुपूर्द केले.
टाटा पॉवरच्या हायड्रो डिव्हिजनचे प्रमुख श्री. प्रभाकर काळे यांनी सांगितले, “कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यापासून आम्ही स्थानिक अधिकारी व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला या साथीविरोधातील लढ्यात मदत करण्यासाठी आमच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अत्यावश्यक साधनसामग्रीचा तुटवडा भरून काढण्यासाठीचे आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करण्याचे आमचे प्रयत्न पुढे देखील असेच सुरु राहतील.”
तपासण्या, लसीकरण, लोकांचा दृष्टीकोन आणि जनजागृती, रुग्णालयांमध्ये बेड्स, औषधे व ऑक्सिजनची उपलब्धता यांच्याशी संबंधित अनेक आव्हाने उभी राहत असताना टाटा पॉवर स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी, चांगल्या दर्जाचे फिल्टर-बेस्ड मास्क्स बनवून वितरित करण्यासाठी, स्थानिक संस्थांना कोविडपासून संरक्षण देणारे किट्स आणि घरी आयजोलेशन काळात सहायक ठरणारे किट्स दान करणे आणि कोविडविरोधात काळजी घेण्यासाठी टेली हेल्पलाईन्स सक्षम करणे असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाची मदत करत आहे.
