खासदार राजीव सातव अनंतात विलीन
कळमनुरी, दि. १७ – काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यात उपचारादरम्यान रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एक तरुण, आश्वासक नेता अकाली गेल्यामुळे सार्वत्रिक हळहळ व्यक्त होत आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी कळमनुरी, जि. हिंगोली येथे अंत्यसंस्कार झाले.
राजीव सातव यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सत्यजित तांबे यांच्यासह राज्यभरातील कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. सातव यांच्या निधनाने हिंगोलीतील अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून करोनाची लक्षणे जाणवत होती. २२ एप्रिलला त्यांच्या करोनाच्या चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे त्यांनी स्वतःच ‘ट्वीट’द्वारे जाहीर केले होते. त्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर २३ एप्रिलपासून उपचार सुरू होते. २८ एप्रिलला त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही पुण्यात त्यांच्या उपचारासाठी आले होते. त्यांना मुंबईला रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न काँग्रेसजनांकडून सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने हलविण्यात आले नाही. उपचारांदरम्यान नऊ मे रोजी त्यांच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने ते करोनामुक्त झाले. मात्र, दीर्घ आजारामुळे त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने गुंतागुंत वाढली आणि विविध अवयवयांना संसर्ग होऊन रविवारी पहाटे चार वाजून ५८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
