शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंप जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करा – सुभाष देसाई
औरंगाबाद, दि. 17 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. शेतीसाठी वीज हा महत्त्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक घेणार असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, उदयसिंह राजपुत, प्रा. रमेश बोरनारे, संजय सिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळेक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात कापुस आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे ह्या अनुषंगाने देखील विभागाने नियोजन करावे. इतर पिकांचे बियाणे तसेच खत शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी नियोजन करावे. मागच्या वर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी पाहता सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या बियाणे कंपन्यानी पुन्हा ही तक्रार येऊ देऊ नये असे सांगत पालकमंत्री म्हणाले की, रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून हा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत मार्ग काढला जाईल किंवा या बाबतीत शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का या बाबतीत देखील प्रयत्न केल्या जातील असेही पालकमंत्री म्हणाले.
रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वीज अत्यंत आवश्यक आहे. विजेशिवाय शेती करणे अशक्य आहे म्हणून पालकमंत्री महोदयांनी लवकरात लवकर मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न मार्गी लावावा.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जिल्ह्यात सोयाबीनला मागणी वाढत आहे तसे नियोजन विभागाने करावे, शेततळ्याचे 75 टक्के अनुदान मिळणे बाकी आहे ते तात्काळ मिळावे, टंचाईग्रस्त गावातील पाणी पुरवठा योजना सुरू कराव्यात, खत पुरवठा वेळेत व्हावा जेणेकरुन शेतकऱ्यांना सोयीचे होईल असेही ते म्हणाले.
