प्राथमिक आरोग्य केंद्रात पेडिएट्रिक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन
नागपूर दि. 17 :- तिसऱ्या लाटेचा इशारा पाहता लहान मुले व बालकांसाठी ग्रामीण भागात तालुकानिहाय पेडिएट्रिक कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळ, यंत्रसामुग्री तसेच औषध पुरवठा यामध्ये स्वयंपूर्ण करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्वला बोढारे, शिक्षण सभापती भारती पाटील, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकीत्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात रूग्णांचा आलेख कमी होत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. सध्या दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येते. मात्र हयगय करून चालणार नाही, असे केदार यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेचा जो अंदाज वर्तविण्यात येत आहे ते पाहता वेगाने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्थेच्या नियोजनाचे सादरीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार यांनी केले. त्यानुसार जिल्हयात प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, इमारत स्तरावर पेडिएट्रिक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. या सेंटरव्दारे 130 बेड उपलब्ध होतील. त्यामध्ये नविन व प्रशस्त इमारत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्राधान्य द्यावे. बालकांच्या काळजीसाठी त्यांच्या मातांदेखील सोबत राहतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था प्रस्तावित सेंटरमध्ये किंवा त्या लगतच्या परिसरात करण्याची सूचना मंत्री महोदयांनी केली.
जिल्हयात 0 ते 6 वयोगटात 1 लक्ष 67 हजार 501, 6 ते 18 वयोगटात 4 लक्ष 5 हजार 793 अशी बालकांची संख्या असून 0 ते 18 मध्ये एकूण 5 लक्ष 73 हजार 294 बालकांची संख्या आहे. ग्रामीण भागातील पेडिएट्रिक कोविड केअर सेंटरच्या कामासाठी तालुका टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून तहसिलदार याचे अध्यक्ष तर तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असतील. अशी माहिती सेलोकार यांनी दिली.
पेडिएट्रिक कोविड केअर सेंटर मध्ये लहान मुलांवर उपचार करण्यात येतील. मात्र ते करतांना नॉन-कोविड उपचार व पुरविण्यात येणाऱ्या अन्य वैद्यकीय सेवांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता तिथे कार्यरत डॉक्टरांनी घेण्याची सूचना मंत्री. केदार यांनी केली. या सेंटरमध्ये डॉक्टरांची सेवा उपलब्धता करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
टेलीमेडीसीन उपचार पध्दतीव्दारे शहरातील बालरोगतज्ञ या सेंटरमधील कार्यरत डॉक्टरांना उपचार पध्दतीत मार्गदर्शन करतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मेडीकल व पॅरा-मेडीकल स्टॉफला पेडिएट्रिक कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या महीन्याअखेर पर्यत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रस्तावित पेडिएट्रिक कोविड केअर सेंटर-
प्रा. आ. केंद्र सोमनाळा, प्रा. आ. केंद्र टाकळघाट, प्रा. आ. केंद्र मनसर, प्रा. आ. केंद्र सालई गोधाणी, प्रा. आ. केंद्र येनवा, प्रा. आ. केंद्र धापेवाडा, प्रा. आ. केंद्र. पाटणसावंगी, प्रा. आ. केंद्र तितूर, प्रा. आ. केंद्र भिष्णूर, प्रा. आ. केंद्र भूगाव, प्रा. आ. केंद्र धानला, प्रा. आ. केंद्र साटक, प्रा. आ. केंद्र पाचगाव.
