‘कोरोनामुक्त भारत’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न-महा एनजीओ फेडरेशनतर्फे आयोजन
पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते प. पू. श्री श्री रवीशंकर यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोरोनामुक्त भारत याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य चिकित्सापद्धती, होमिओपॅथी या उपचार पद्धतींसोबतच ऋतुचर्या आणि आहार विज्ञान या महत्त्वाच्या विषयावर देखील चर्चा झाली.
चर्चासत्राचे आयोजन महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरूडकर, मुकुंद शिंदे यांनी केले होते. राज्यभरातील नामवंत डॉक्टरांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ६५ स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून श्री श्री सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २० मे पर्यंत राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.
कोरोना जन्य परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजन, प्लाझ्मा देणगीदार यांची यादी निर्माण करणे, गरजूंना धान्य किट वाटप, मास्क वाटप, फेस शिल्ड वाटप, पीपीई किट तसेच आयुर्वेदिक काढा व आर्सेनिक गोळ्यांचे वाटप राज्यातील ६५ ठिकाणी करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस एक शास्त्रीय ओळख या विषयावर आयुर्वेद पंचगव्य औषध संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशिष पोलकडे यांनी मार्गदर्शन केले. कोरोना उपचारपद्धती व संभाव्य धोके, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा कोरोना रुग्णांना होणारा फायदा, होमिओपॅथी व कोरोना चिकित्सा, पंचगव्य चिकित्साचा कोरोनाविषयी सिध्द होणारे परिणाम याविषयी अनुक्रमे डॉ.कल्याण गंगवाल, डॉ. हितेश जानी, डॉ मनीषा सोळंकी, सुनील मानसिंगका यांनी आपले विचार मांडले.
याशिवाय कोरोना व सरकारी आरोग्य सेवा, कोरोना लढाईत आवश्यक वैद्यकीय दृष्टिकोन, कोरोना मुक्तीसाठी योग – प्राणायामाचे फायदे आणि ऋतुचर्या व आहार विज्ञान या विषयावर डॉ. सुनील इप्पर, डॉ. जयश्री तोडकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजेंद्र राऊत, निसर्ग उपचारतज्ज्ञ डॉ. सुनील ठिगळे यांनी मार्गदर्शन केले.
शेखर मुंदडा म्हणाले, चांगली जीवनशैली असेल तर कोरोनाचा सामना करता येऊ शकतो. कोरोना उपचारामध्ये होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक उपचारपद्धती देखील प्रभावी ठरत आहे. याबाबत मार्गदर्शनासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी वॉर रूम चे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विजय वरुडकर म्हणाले, चर्चासत्रासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील कात्रज, कैलास, येरवडा, कोरोगाव पार्क, वैकुंठ स्मशानभूमी मधील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या ६५ कर्मचारी यांना पीपीई किट व रोग प्रतिकारक शक्ती वाढवणा-या कबुसरा आयुर्वेदिक औषधाचे वाटप करण्यात आले. यामध्ये अमृता जगताप, केदार गजऋषी, मंदार गजऋषी यांनी सहभाग घेतला. विविध उपक्रमांसाठी गणेश बाकले, शशांक ओंबसे, अक्षय भोसले, अमोल उंबरजे, राहुल पाटील, उमेश पाचलग, गोरक्ष घाडगे यांचे सहकार्य लाभले.
