fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारे उपक्रम गरजेचे- सह धर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के

पुणे : कोविडच्या काळात अनेक मंदिरे व सामाजिक संस्था समाजोपयोगी उपक्रमांसाठी कार्यरत आहेत. त्यात अनेकजण वैयक्तिकरित्या देखील आपले योगदान देत आहेत. विविध ठिकाणी विनामूल्य सॅनिटायझेशन करणारे किरण सावंत आणि तब्बल २ हजारहून अधिक कोविड मृतदेहांवर विनामोबदला अंत्यसंस्कार करणारे जावेद खान यांचा सन्मान लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टने करणे कौतुकास्पद आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारे असे उपक्रम होणे गरजेचे आहे, असे मत सह धर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के यांनी व्यक्त केले. 

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे अक्षयतृतीया व ईदनिमित्त किरण सावंत व जावेद खान यांचा सन्मान करण्यासोबत त्यांना धान्य किट, सॅनिटेशन किट व मास्क हे साहित्य आणि प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी उपधर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. 

सुनिल रुकारी म्हणाले, अक्षयतृतीया आणि ईद यंदा एकाच दिवशी आल्याने एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून केला आहे. भक्तांनी दान म्हणून दिलेल्या निधीचा विनीयोग योग्य पद्धतीने व समाजोपयोगी कार्यासाठी व्हावा, असा विश्वस्तांचा प्रयत्न आहे. त्यामुळे चांगले कार्य करणा-यांना आर्थिक मदत देण्यासोबतच सामाजिक बंधूता राखण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही यामाध्यमातून करीत आहोत. दत्तमंदिर ट्रस्टच्या संस्थापिका कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला. तसेच यानिमिताने ट्रस्टतर्फे फेसबुक पेजवर आयोजित व्याख्यानमालेचा समारोप डॉ.अविनाश भोंडवे यांच्या आरोग्यतत्व याविषयावरील व्याख्यानाने रविवारी होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading