पुणे : साहित्य, संगीत, तत्वज्ञान, नाटक, काव्य अशा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे, आशियातील व भारतातील साहित्याचे पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे विश्वविख्यात व्यक्तिमत्व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. भारत व्हनकाटे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. धोंडिभाऊ बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर मिली बॅनर्जी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या समग्र जीवनाचा व साहित्याचा परिचय उपस्थितांना करून दिला व रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्र या विषयावर आपले विचार प्रस्तुत केले. रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील मराठी संत साहित्य, तसेच मराठी लेखक व कवींवर रवींद्रनाथ टागोर यांचा असलेला प्रभाव, याचा आढावा प्रा. सुनील धनगर यांनी आपल्या विवेचनात घेतला.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “रवींद्रनाथ टागोर हे आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपला वसा जोपासला. त्यांची पत्नी मृणालिनी, मुलगा समींद्रनाथ, कन्या मधुरीलता आणि बेला यांच्यासह आयुष्यातील वैयक्तिक नुकसान त्यांना विश्वस्तरीय कवी, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी होण्यास अडवू शकले नाही. त्यांच्या वैयक्तिक वेदनेचे दु:ख त्यांच्या साहित्यात बर्याचवेळा प्रतिबिंबित होत राहिले.”
“टागोर हे एक सवेंदनशील व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांनी जालियनवाला बाग नरसंहाराच्या निषेधात सर ही पदवी नाकारण्याचे धाडस केले. लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीवेळी निषेध म्हणून सामाजिक आणि सांप्रदायिक सौहार्दाचा उपदेश केला. रवींद्रनाथ टागोर हे एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व आहे, जे मानवजातीसाठी एकदाच झाले. या महान विभूतीच्या जीवनकार्यातून व साहित्यातून आपण सर्व नक्कीच बोध घेण्याचा संकल्प करूया,” असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
Related