fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पडद्यामागील कलाकारांचा विमा मोफत काढणार आनंद पिंपळकर यांची घोषणा

पुणे : नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील पडद्यामागील कलाकर-तंत्रज्ञांचा प्रत्येकी दोन लाखांचा विमा मोफत काढून देणार असल्याची घोषणा आनंदी वास्तूचे प्रवर्तक, सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आज केली. तर संवाद पुणेतर्फे वृद्ध-गरजू कलाकारांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचा तसेच महिला कलाकारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मदतीचा हात दिला जाणार असल्याचे सुनील महाजन यांनी जाहीर केले.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संवाद पुणेतर्फे आनंद पिंपळकर यांच्या सहयोगाने पडद्यामागील कलावंत, नाट्य बुकिंग व्यवस्थापक, पेंटर अशा गरजू कलाकारांना अन्नपूर्णा वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या वेळी पिंपळकर बोलत होते.

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूकर, अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, प्रणव पिंपळकर, सामाजिक कार्यकर्त्या सोनम पाटील, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, प्रितम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


आनंद पिंपळकर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. समाजाकडून येणारा पैसा समाजकार्यासाठी वापरण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
सध्याच्या नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक विचारधारेतून जीवन जगणे आवश्यक असल्याचे सांगून राहुल सोलापूरकर म्हणाले, स्वस्तात मनोरंजनाची साधने उपलब्ध असली तरी नाटक ही जीवंत कला असल्याने रसिकांना तिच अधिक भावते. त्यामुळे कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर रंगभूमीला नक्कीच चांगले दिवस येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे, अशी अपेक्षा सोनम पाटील यांनी व्यक्त केली.

महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न : सुनील महाजन
सध्याची परिस्थिती कधी निवळेल याची शाश्वती नसल्याने पडद्यामागील महिला कलाकारांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात नमूद केले. हातावर पोट असणार्‍यांना कलावंतांना मदतीचा हात देतानाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप तसेच वृद्ध कलाकारांना लस मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कलाकार-तंत्रज्ञांसाठी निधी उभारणार : प्रविण तरडे
कोरोनाच्या संकटामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. सध्या कलावंत-तंत्रज्ञांना काम नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्याच्या परिस्थितीत तात्पुरती मदत किती दिवस पुरणार हा प्रश्न मनात चित्रपट निर्मितीसाठी केल्या जाणार्‍या खर्चातील काही रक्कम, तसेच चित्रपटाद्वारे मिळालेल्या नफ्यातील काही रक्कमही कलाकार-तंत्रज्ञांच्या मदतीसाठी बाजूला ठेवावी, असा प्रस्ताव चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना दिला असल्याचे अभिनेते प्रविण तरडे यांनी आवर्जून सांगितले. ‘मुळशी पॅटर्न’च्या माध्यमातून गेल्या वर्षी 350 कलाकारांना मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी चित्रपटाच्या माध्यमातून पाच लाख रुपये मदतीसाठी फंड रुपाने ठेवून या उपक्रमास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading