पं. विनायक थोरात यांचे निधन

पुणे, दि. ५ – संगीत नाटकांच्या तबलासाथीवर स्वत:चं नांव कोरणारे कलासाधक जेष्ठ तबलावादक पं. विनायकराव वसंतराव थोरात यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्याचा मागे पत्नी प्रमिला व शिष्य परिवार आहे.

संगीत क्षेत्रात छोटूकाकां नावाने कीर्ती प्राप्त पं. विनायक थोरात यांचा जन्म 18 May 1935 रोजी झाला. बालपण दौंड येथे गेले. वडील रेल्वेत नोकरीत तसेच तबलावादक असल्याने त्यांना लहानपणी तबल्याची गोडी लागली. तबल्याचे शिक्षण त्यांनी सुरुवातीला वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने घेतले. रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाल्याने ताल, लय, सूर पक्के होऊन लयीचे ज्ञान प्राप्त झाले. एकल तबला वादनाचे कार्यक्रम सुरू असताना जयराम व जयमाला शिलेदारांच्या सहवासात आल्यावर संगीत नाटकांना त्यांनी साथ करायला सुरुवात केली. आदर्श तबला साथ असं त्यांच्या साथीचं वर्णन होत.

लहान वयापासून त्यांनी तबला साथसंगत करण्यास प्रारंभ केला. पं. जितेंद्र अभिषेकी, व्हायोलिन वादक डी.के.दातार, पं.भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, मोगुबाई कुर्डीकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, किशोरी आमोणकर, राम मराठे, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना त्यांनी तबला साथ केली. त्यांचे विशेष स्नेहबंध जुळले ते शिलेदार कुटुंबीयांशी. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबला साथ रसिकांच्या स्मरणात राहील. पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार तर शासनाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराचे ते मानकरी होते.

Leave a Reply

%d bloggers like this: