fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि २९ : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत अजिबात दिरंगाई नको

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे  गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या  आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे.

इतर राज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवा

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगधंदे थांबू नयेत

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केलीआहे का  ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ.तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading