साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरतर्फे आयोजीत रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणेः- भारतीय संस्कृतीत दान या संकल्पनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामध्ये रक्तदान हे तर सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. सध्याची एकंदर परिस्थिती खूप भयानक आहे. आपल्याला कुठल्या मार्गाने मदत करता येईल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्या दृष्टीने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आणि पुणे विचारपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत रक्तदान महायज्ञ हे एक आर्दश पाऊल असून अशा कठीण काळात प्रत्येकाने आपले सामाजिक भान ओळखून जमेल ती आणि जमेल तेवढी मदत करणे अपेक्षित असल्याचे मत पोलीस अधिकारी सतीश गोवेकर यांनी व्यक्त केले.
सध्या निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीचे आैचित्य साधत साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आणि पुणे विचारपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने साखळीपीर तालिम, नाना पेठ भाजी मंडई येथे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत झालेल्या या रक्तदान महायज्ञांत 165 रक्ताच्या बाटल्या संकलीत झाल्या. यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र अण्णा माळवदकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष भाई कात्रे, रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक शिवराज रविंद्र माळवदकर, पोलीस अधिकारी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णू ताम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधिकारी सतीश गोवेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आैपचारीक उद्घाटन करण्यात आले.
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र अण्णा माळवदकर म्हणाले की, सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. तसेच १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु होणार आहे. एकदा लस घेतल्या नंतर पुढचे किमान २ महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे आत्ताच रक्तदान करणे अवश्यक आहे. मंडळाने सामाजिक भान बाळगत पारंपारीक पद्धतीने हनुमान जंयती साजरी न करता खर्च टाळत रक्तदान शिबिर सारखा सामाजिक उपक्रम राबविला.
