fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

भारतीय राज्यघटना हा देशाचा आत्मा – राजू शेट्टी

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची कमतरता आज आपल्याला जाणवते. दक्षिण, उत्तर, नैॠत्येकडेच प्रश्न वेगळे होते. विविध जाती, धर्म असलेल्या देशात सगळ्यांना एकत्रित बांधण्याचे काम त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केले. त्यामुळे भारतीय राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. त्यामध्ये राजू शेट्टी यांच्या व्याख्यानाने उपक्रमाचा समारोप झाला. लायन्स क्लब इंटरनॅशनल व लायन्स क्लब आॅफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला पार पडली. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित करण्यात आली होती. 

राजू शेट्टी म्हणाले, आजही शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतक-यांच्या वाढलेल्या आत्महत्यांकडे ७० वर्षात अक्षम्य दुर्लक्ष झाले. शेतक-यांना समाजाच्या प्रवाहात आणायला हवे, ही भूमिका डॉ.आंबेडकरांनी त्याकाळी घेतली होती. शेतीबद्दल वेगळे चिंतन बाबासाहेबांनी करुन ठेवले आहे. शेती शाश्वत करायची असेल, तर पाऊस व नदीतील पाण्याचे नियोजन करावे लागेल, हा विचार त्यांनी तेव्हा मांडला होता. 
ते पुढे म्हणाले, जातीवर आधारित असलेली आपली समाजव्यवस्था आहे. यामध्ये छोटा शेतकरी पिसला जात आहे. यात परिवर्तन करायचे असेल, तर शेतीला पायाभूत सुविधा द्यायला हव्या. त्याकरीता शाश्वत सिंचन व वीज सवलतीच्या दरात द्यायला हवी, हा विचार त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मांडला होता. डॉ.आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी ख-या अर्थाने शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व्हावा, याउद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading