पहिली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला शनिवारपासून
पुणे : शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दिनांक १० ते २० एप्रिल दरम्यान दररोज रात्री ८ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
व्याख्यानमालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजकारण, ग्रामीण धोरण, आरक्षण निती, मानवमुक्तीचा लढा, शाहु-फुले-आंबेडकर चळवळ, सामाजिक-आर्थिक लाभाची व मुलभूत हक्कांची संकल्पना जिवंत आहे का?, पत्रकारिता, डॉ. आंबेडकर व महिला सबलीकरण आदी विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. लायन्स क्लब इंटरनॅशनल व लायन्स क्लब आॅफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होत आहे. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होणार आहेत.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्याख्यानमालेचे उद््घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांच्या व्याख्यानाने होणार आहे. तर, ज्येष्ठ विश्लेषक विश्वंभर चौधरी, मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ.अनिल लोखंडे, प्रख्यात व्याख्यात्या सुषमा अंधारे, राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.असिम सरोदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे डायरेक्टर प्रवीण रणसुरे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आदींची व्याख्याने होणार आहेत. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या व्याख्यानाने मालिकेचा समारोप होणार आहे. सर्व व्याख्याने विनामूल्य असून विद्यार्थी व तरुणाईने मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.