‘सीईजीआर’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ‘सूर्यदत्ता’चे प्रा. डॉ. संजय चोरडिया

पुणे : नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्चच्या (सीईजीआर) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांकरिता ही नियुक्ती असून, नुकत्याच झालेल्या ‘सीईजीआर’च्या बैठकीत त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ‘सीईजीआर’ ही संस्था देशातील शिक्षण क्षेत्रासाठी कार्यरत असलेला एकमेव आणि नामांकित असा विचार गट आहे. शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी शिक्षणतज्ज्ञ, माध्यमे आणि धोरणकर्ते यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. सोबतच संशोधन आणि इनोव्हेशनच्या साहाय्याने व्यापक शिक्षणवृद्धीचा प्रयत्न याद्वारे केला जातो.


‘सीईजीआर’मध्ये १० हजारांपेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, संशोधक यांचा समावेश आहे. ‘सीईजीआर’ नॅशनल कौन्सिलवर केरळचे राज्यपाल, नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिएशन (एनबीए), अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतील (एआयसीटीई) नियंत्रक, देशाच्या विविध भागातील ५० कुलपती, कुलगुरू आदींचा सहभाग आहे. एकाच दिवशी १४ राज्यात ५६ कार्यक्रम घेणारा ‘सीईजीआर’ हा एकमेव शैक्षणिक विचार गट आहे. त्याला इंडियन एज्युकेशनल फेस्टिवल संबोधले जाते.


नियुक्तीबद्दल डॉ. चोरडिया म्हणाले, “शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणे आनंददायी आहे. देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, कुलगुरू, उद्योजक, संशोधक यांच्या विचारमंथनातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत उहापोह होतो. भावी पिढीला अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी ‘सीईजीआर’च्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे.”
“सूर्यदत्ता शिक्षण संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही गेली दोन दशके करत आहोत. देशभरात शिक्षण क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबविण्यास मदत होते. तसेच आमच्या येथील अनेक चांगले आणि सर्वांगीण विकासाचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. दर्जेदार शिक्षण सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले, तर विद्यार्थ्यांचा, कुटुंबीयांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास सध्या होईल,” असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: