fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

वैद्यकीय क्षेत्रात कौशल्या इतकेच वात्सल्यही महत्वाचे- डॉ.मिलिंद भोई

पुणे : सध्याच्या काळात तांत्रिक प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात कौशल्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग रुग्णांवर उपचार करताना वापरण्यासोबतच वात्सल्यभाव ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अनेक डॉक्टर्स समाजासमोर स्तुत्य आदर्श ठेवत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कौशल्या इतकेच वात्सलही महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई यांनी केले. 

श्रीमती अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे स्वारगेटजवळील अलायन्स मुनोत हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी अशा तब्बल ५० वैद्यकीय सेवकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, डॉ. विजय पोटफोडे, सदाशिव कुंदेन, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.योगेश आसवा आणि डॉ.आयुषी आसवा यांनी हा सन्मान स्विकारला. सन्मानपत्र, उपरणे, मिठाई असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी पुष्पवृष्टीतून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

डॉ. विजय पोटफोडे म्हणाले, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे व्रत अंगिकारुन अनेक रुग्णालये कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात कोविड रुग्ण व इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार देण्याची कसरत रुग्णालयांनी केली आहे. याचे श्रेय डॉक्टरांसोबत परिचारिका व इतर सेवकांना जाते. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, वैद्यकीय व्यवसाय असे म्हटले जात असेल, तरी देखील त्यामध्ये सेवाकार्य आहे. कोरोनाच्या काळात आपल्या सेवाभावी वृत्तीला ईश्वरसेवेचे कोंदण देत, डॉक्टर्स व त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे रुग्णसेवा करीत आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा सन्मान प्रत्येकाने करायला हवा. व्यवसायापलिकडे जाऊन सेवा करण्याचे हे व्रत आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांत देखील सुरुवातीला सोय करण्यात आली होती. खासगी रुग्णालयातील अनेक गरजू रुग्णांचा खर्च महापालिकेतर्फे करण्यात आला होता. त्याप्रमाणे या दुस-या लाटेच्या वेळी देखील खासगी रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांकरीता महापालिकेने मदत करण्याची सोय करायला हवी, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.वृषाली जाधव-मोहिते, विराज मोहिते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विक्रांत मोहिते यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading