तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गणेशोत्सव सजावटीतून सेवा देणा-या कलाकारांचा सन्मान
पुणे : श्री तुळशीबाग गणपतीची सन १९५२ सालापासून म्हणजे तब्बल ६० वर्षे सजावटीच्या माध्यमातून सेवा करणारे आदरणीय कलामहर्षी कै.डी.एस खटावकर सर यांच्या जयंतीनिमित्त ज्या व्यक्तींनी तुळशीबाग गणपती उत्सवात आदरणीय खटावकर सरांच्या सहकार्याने योगदान दिले आहे, अशा सन्माननीय व्यक्तींना श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, उपाध्यक्ष विनायक कदम, कार्याध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडीत यावेळी उपस्थित होते. विजय विश्वासराव, ज्येष्ठ चित्रकार आशा विश्वासराव, रजनी फणसाळकर, विजया बागूल, प्रभा कवठेकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
विवेक खटावकर म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक देखावे सादर करायची परंपरा डी.एस खटावकर यांनी सुरु केली. शताब्दी वर्षात प्रथमच एखाद्या कलाकाराने मंडळाचा अध्यक्ष म्हणून नावलौकीक मिळविला. कलेच्या योगदानाबद्दल डी.एस खटावकर यांना तो सन्मान मिळाला.
अनेक शिल्पकार विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करुन शिल्पकलेची विद्या त्यांनी दिली. तुळशीबाग मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले तसेच अनेक मंडळांना मार्गदर्शन देखील केले.