Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

Breking अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई, दि. ५- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आता ते मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. ‘मुंबई हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. ते लवकरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत’, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ‘मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे ऍड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती’, असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading