बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई, दि. ४ – गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना व्हायरसची शिकार झाले आहेत. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारचीसुद्धा भर पडली आहे. अक्षय कुमारनेही त्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि ‘आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या.’
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूर, आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर. माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
