सोनालिका च्या देशातील विक्रीत सर्वाधिक ४१.६ टक्के वाढ
नवी दिल्ली – २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रत्येक महिन्याला उत्तम विक्री नोंदत सोनालिका ट्रॅक्टर्स ने आपली प्रगतीची घोडदौड चालू ठेवून आपल्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे. २०२०-२१ मध्ये आपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक म्हणजे १३९,५२६ ट्रॅक्टर्स ची विक्री करून कंपनीने बाजारात सर्वात मोठा हिस्सा काबीज केला आहे . कंपनीने २०१९-२० च्या तुलनेत ४१.६ टक्के एवढी लक्षणीय वाढ नोंदून ट्रॅक्टर उद्योगाच्या २३ टक्के (अंदाजे ) प्रगतीच्या तुलनेत भरघोस कामगिरी केली आहे. याबरोबरच सोनालिका ने आजवरचे सर्वाधिक म्हणजे ५०,००० रोटाव्हेटर विकून २०२९-२० च्या तुलनेत १०० टक्के वाढ नोंदली आहे. कंपनीने मार्च २०२१ मध्ये १३०९३ ट्रॅक्टर विकून मार्च २०२० पेक्षा १३५ टक्के जास्त चांगली कामगिरी केली आहे.
कंपनीच्या निर्यात कामगिरीविषयी सोनालिका समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दीपक मित्तल म्हणाले, या वर्षीच्या असामान्य यशाबद्दल मला अत्यंत आनंद आहे. आमचा मजबूत पाया या आव्हानात्मक वर्षात कंपनीच्या असामान्य कामगिरीसाठी पोषक ठरला आणि एका वर्षात २०००० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलो आहोत. आमचे निष्ठावंत कर्मचारी, वितरक, डीलर, वित्त पुरवठेदार आणि विश्वासू ग्राहक यांचे हे यश आहे. विषम परिस्थितीत, प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नसतानाही ते आमच्या सतत संपर्कात राहिले. आम्ही सहा देशांत पहिल्या क्रमांकावर तर आणखी पाच देशांत दुस-या क्रमांकावर आहोत ही अभिमानाची बाब आहे.
या कामगिरीविषयी सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक श्री रमण मित्तल म्हणाले, २०२०-२१ या अत्यंत कठीण वर्षात देशांतर्गत विक्रीचा ४१.६ टक्के हा लक्षणीय टप्पा गाठणे आणि ट्रॅक्टर उद्योगाच्या २३ टक्के (अंदाजे ) प्रगतीच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करणे ही शेतकरी आणि समाज यांच्याशी जोडलेले राहण्यासाठी रचलेला आमचा पाया किती मजबूत आहे याचे द्योतक आहे आणि हा पाया सतत मजबूत होत आला आहे. अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करताना आमच्या योजनांमध्ये आम्ही काहीही बदल केले नाहीत आणि ग्राहकांना सेवा देणे आणि व्यवसाय वाढवणे आम्ही सातत्याने चालू ठेवले. आमच्या व्यवसायाच्या पद्धतीत काळानुसार फेरफार केल्यानेच आम्ही या वर्षी दर महिन्यात स्पष्ट आघाडी मिळविली.
