समाजवादी शीलाचे नागरिक निर्माण करणे हेच स्वप्न
डॉ. बाबा आढाव यांचे प्रतिपादन
पुणे : लोकशाही, समाजवादाची ध्वजा, निशाण खांद्यावर घेऊन आम्ही आजही काम करीत आहोत. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत निर्माण करणे, समाजवादी शीलाचे नागरिक निर्माण करणे हे आमचे स्वप्न आहे, असा ठाम विश्वास कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला. अविचल सत्याग्रही निष्ठेतून पन्नालाल सुराणा यांनी सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
संवाद पुणे व आरोग्य सेना यांच्या वतीने लोकनेते भाई वैद्य यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून भाई वैद्य यांचे स्नेही, सहकारी पन्नालाल सुराणा यांच्या जीवनकार्यावर आधारित साथी पन्नालाल सुराणा लघुपटाचे स्क्रिनिंग आज झाले. त्या वेळी डॉ. आढाव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य होते. कार्यक्रमाचे आयोजक, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, लघुपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर व्यासपीठावर होते. लघुपटाचे लोकार्पण आणि डिव्हिडीचे प्रकाशन डॉ. आढाव आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. आढाव म्हणाले, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आणि माझी वाट वेगवेगळी असली तरी आम्ही एकाच चळवळीचे पाईक आहोत. सुराणा यांना निवडणुकांमध्ये अपयश आले तरी परिवर्तनवादी विचारांनी समोर येईल त्या कार्याला तडीस नेण्याचा त्यांनी निष्ठेने प्रयत्न केला; जीवनाचा आलेख आश्वासकरित्या उंचावला. पन्नालाल सुराणा यांनी आयुष्यातील कठीण प्रसंगातून कसे मार्गक्रमण केले या विषयीच्या आठवणी त्यांनी जागविल्या.
डॉ. अभिजित वैद्य यांनी लघुपटाच्या निर्मितीची भूमिका विषद करून डॉ. बाबा आढाव यांच्यावरील लघुपटाची निर्मिती आरोग्य सेना आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच केली जाणार असून त्याचे लोकार्पण पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा केली. भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव आणि पन्नालाल सुराणा यांच्या वैचारिक मैत्रीचे सहजीवन अपूर्व होते असे आवर्जून नमूद केले. श्रवण, भिक्खू आणि चार्वाक या तीनही विचारधारांचा संगम पन्नालाल सुराणा यांच्या जीवनात आढळतो. त्यांचे जीवन हा ऐतिहासिक ठेवा आहे, हा मौल्यवान दस्तावेज चित्रफितीच्या माध्यमातून जतन करणे महत्त्वाचे वाटल्याने तसेच पुढील पिढीला या चालत्या बोलत्या दंतकथा पृथ्वीतलावर आहेत हे समजावे यासाठी चित्रफितीची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मान्यवरांचे स्वागत डॉ. अभिजित वैद्य यांनी भाई बंध ग्रंथ देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावनी विनिता यांनी केले. आभार निकिता मोघे यांनी मानले.
