संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरुनच ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
पुणे, दि. ३१ – संकष्टी चतुर्थीला भाविकांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला. त्यामुळे भाविकांनी रस्त्यावरुनच गणरायाचे दर्शन घेतले. तर, अनेकांनी ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे आॅनलाईन पद्धतीने दर्शभाचा लाभ घेतला.
महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्यात आले होते. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी पार पडले. खबरदारी म्हणून नुकत्याच झालेल्या अंगारकी चतुर्थीला देखील मंदिर बंद ठेवण्यात आले होते. तसेच इतर दिवशी भाविकांना सॅनिटायझेशन, तापमान तपासणी व इतर खबरदारी घेऊन प्रवेश दिला जात आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद ठेवण्यात आले. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.