परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक – संजय राऊत

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.

परंतु या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडले आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. ‘अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकानं आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिला. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं. मी काही या सरकारचा घटक नाही. पण हे सरकार आणण्यासाठी मीदेखील थोडे प्रयत्न केले आहेत. मात्र मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही, असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असा प्रश्न विचारला असता, विरोधकांच्या मागणीवर सरकार चालत नाही. विरोधी पक्षाच्या मागणीमुळे सरकारमध्ये उलथापालथ होत नाही, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: