Saturday, June 13, 2026
PUNETOP NEWS

महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा -चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २१ – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असून त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपने अलका टॉकीज चौकात आज तीव्र आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू असून, या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही अशी टीक पाटील यांनी केली. तसेच देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू आहे. परमबीर सिंहाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नितीमत्तेची थोडीशी का होईना; पण चाड शिल्लक असेल, तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा लगेच घेतला पाहिजे, अशी मागणी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

पाटील पुढे म्हणाले की, परमबीर सिंहाच्या पत्रानंतर आता स्पष्ट झाले आहे की, राज्यातील ठाकरे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे सापडला, त्याच ठिकाणी काल आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर गेली आहेत. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अँटिलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता, तर हा विषय कधीच दाबला गेला असता. त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरल्यामुळे वाझेवर कारवाई होऊ शकली.

ते पुढे म्हणाले की, सचिन वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेचा बचाव करत होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं. कारण वाझेचं निलंबन तुम्हाला चालणार नव्हतं. आता तर यावर परमबीर सिंह यांनी देखील याबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे अजून वाझे अजून बोलायचा आहे. एनआयएकडे आता याचा सगळा तपास वर्ग झालाय. त्यामुळे वाझे जर बोलू लागला, तर अनेक गोष्टी बाहेर येतील.

शहर अध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकारच अस्तित्वात राहिलेले नाही. या सरकारमधील मंत्री सामान्य नागरिकांना मारहाण करतात, धमकी देतात, मंत्री महिलांशी गैरकृत्य करतात, पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करतात, कोरोना काळात यांनी मोठा भ्रष्टाचार केला, हे सरकार नसून खंडणी गोळा करणारी भ्रष्ट गुंडांची टोळी आहे. या प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे. साळसूदपनाचा आव आणणाऱ्या खंडणीखोर गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे पुणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, महिला शहरअध्यक्ष अर्चना पाटील, युवामोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading