महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे – जयंत पाटील

नवी दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे या बैठकीसाठी दिल्लीत उपस्थित झाले आहेत. दरम्यान, दोन तासांहून अधिक काळ ही बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

‘महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. महाराष्ट्र एटीएस, एनआयएच्या चौकशीतून ठोस गोष्टी बाहेर येतील. एटीएसचा तपास हा निकालाच्या जवळ येत आहे. त्यांना यश मिळेल,’ असं ते म्हणाले. तर, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. उद्या आणि परवा मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल,’ असं जयंत पाटील म्हणाले.

‘परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल,’ असं शरद पवार म्हणाले. तसेच, ‘मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ.’ असं देखील पवार यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: