Saturday, May 30, 2026
PUNE

आई नावाचे विद्यापीठ पुन्हा एकदा घरा-घरात प्रस्थापीत व्हावे – प्रा. मिलिंद जोशी

पुणेः- छत्रपती शिवाजी महाराज यांनी आईच्याच प्रेरणेतून स्वराज्याचे तोरण उभारले, साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहून इतिहास रचला. तसेच विनोबा भावे यांनी देखील आईची महती विषद केली आहे. निर्गुण निराकार आणि सगुण साकार म्हणजे आई. आई नावाचे सर्वोत्तम विद्यापीठ घराघरांतून हरवले असून ते पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजे असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्य़ाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा आदर्श आई पुरस्कार आज पूण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सतीश देसाई यांच्या मातोश्री 96 वर्षीय स्वातंत्र्य सेनानी उषा देसाई यांना व्याख्यात्या प्रतिभाताई शाहू-मोडक यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी जोशी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, अनेकदा आई म्हणून, कुटुंबातील एक स्त्री म्हणून केवळ कुटुंबा पुरत्या मर्यादित असलेल्या जबाबदा-या उषाताईंनी निभावल्याच परंतू, त्याही पुढे जाऊन त्यांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र ह्या तीनही पातळ्यांवर यथार्थपणे जबाबदा-या निभावल्या. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्राकरता सक्रिय सहभाग घेण्याची उषाताईंना संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोन्यात रूपांतर केले . शिक्षण संस्थांचे मूल्यमापन त्या संस्थेने किती कर्तबगार विद्यार्थी घडवले या परिमाणावर केले जाते, त्याच पद्धतीने आईने समाज आणि राष्ट्रा करता कसे कर्तृत्व संपन्न सुपुत्र तयार केले, यावरही आईचे मोठेपण सिद्ध होते. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ ह्यात जमीन-आस्मानाचा फरक पडला असून स्वातंत्र्योत्तर काळात मूल्यव्यवस्था बदलून गेल्या आहेत . जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे स्वतःचेच आई वडील सांभाळायला कायदे करावे लागत आहेत. लौकिक अर्थाने आपण प्रगती केलीही असेल मात्र, मूल्य व्यवस्थेच्या पातळीवर आपण नक्कीच अधोगती गाठली आहे. कुटुंबव्यवस्थेत राहतांना ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली नाते संबंधांचा कडेलोट झालेला पहायला मिळतो. घराची वास्तू कितीही सुंदर असो परंतू दुभंगलेली मने आणि विस्कटलेली मने हे चित्र घराघरांत दिसत आहे.

यावेळी बोलताना अॅड. प्रमोद आडकर म्हणाले की, 96 वर्षीय उषा देसाई यांनी आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पायंडा पाडला असून कठीण परिस्थितीतूनही त्यांनी मुलांना राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू बनवले. तसेच 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय भाग घेतला. त्यांचाय याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज आदर्श आई हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रतिभाताई शाहू-मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. उषा देसाई यांनी स्वातंत्र्य लढ्यातील रम्य आठवणींना उजाळा दिला. कवी उद्धव कानडे यांनी मानपत्राचे वाचन केले. सिद्धार्थ देसाई यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading