डॉ.सुधाकरराव जाधवर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजला नॅकचा ब दर्जा

पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित डॉ.सुधाकरराव जाधवर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजला नॅशनल असिसमेंट अ‍ँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल (नॅक) चा ब दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतेच नॅक कमिटीतील पुण्यात आलेल्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाला भेट देत पाहणी करुन हा दर्जा दिला आहे. नॅक कमिटीतील जगन्नाथ विद्यापीठ जयपूरचे कुलगुरु डॉ.मदन मोहन गोयल, उत्तर बंगाल विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.देवव्रत मित्रा, चिन्मया डिग्री कॉलेज हरिद्वारचे प्राचार्य डॉ.अलोक कुमार यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.मदन मोहन गोयल म्हणाले, अनेकदा शैक्षणिक संकुलातील गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या याचे समीकरण जुळत नाही. त्यामुळे नॅशनल असिसमेंट अ‍ँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल (नॅक) चा उद्देश शैक्षणिक संकुलातील गुणवत्ता पाहणी करीत ती राखण्याकरीता उद्युक्त करणे हा आहे. विद्यार्थ्यांनी नॅक ने दर्जा दिलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने, गुणवत्तापूर्ण व सुविधायुक्त शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. सरकारतर्फे ज्या सुविधा दिल्या जातात, त्यादेखील महाविद्यालयांना मिळतात. डॉ.देवव्रत मित्रा म्हणाले, नॅक कमिटी जो अहवाल पाठवते, त्यावर महाविद्यालयाचा विकास अवलंबून आहे. नॅकने दर्जा दिलेल्या महाविद्यालयाला विद्यार्थी पसंती देतात. डॉ.अलोक कुमार म्हणाले, या महाविद्यालयाने इमारत उत्तमरित्या साकारली आहे. कोविड काळात नॅककरीता अर्ज केला, ही कौतुकाची बाब आहे. येथील पाहणी केल्यानंतर महाविद्यालयातील येणा-या विद्यार्थीनींना शिक्षण संकुलात शिक्षण घेताना सुरक्षित वाटते, ही चांगली गोष्ट समोर आली आहे. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर म्हणाले, हे आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज आहे. ग्रामीण, गरजू, गरीब, मागास व आदिवासी विद्यार्थ्यांची सोय व्हावी, याकरीता उपनगरांत हे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. पाच वर्षात स्वत:च्या संकुलात महाविद्यालयाचे कामकाज चालते. पहिल्याच प्रयत्नात हा दर्जा मिळाला आहे. नॅक कमिटीच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे महाविद्यालय भविष्यात काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.  

Leave a Reply

%d bloggers like this: