Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

पोलीस अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या, त्यामुळेच बदली – अनिल देशमुख

मुंबई, दि. १८ – अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. याच प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तर, सचिन वाझेंना एनआयएने अटक केल्यामुळे पोलीस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे.

तर, भाजपने या प्रकरणावरून गंभीर आरोप करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासापासून ते सचिन वाझे यांच्या पर्यंत पोलीस दलाच्या तपासाबाबत शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव ठेवत असल्यामुळे त्यांना योग्य कामकाज करता येत नसल्याची टीका भाजपने केली आहे.

दरम्यान, काल विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यात मुंबईचे पूर्व पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा देखील समावेश होता. सचिन वाझेंच्या प्रकरणामुळेच या बदल्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. तर, केवळ रुटीन बदल असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र, आता अधिकाऱ्यांच्या चुकांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

‘आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या आहेत. या चुका वेळीच सुधारून निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी बदल्या करण्यात आल्या आहेत,’ असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. ‘चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल. खालच्या किंवा वरच्या दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल,’ अशी ग्वाही देखील देशमुखांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading