आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांचा सिंहाचा वाटा — उमा खापरे

पुणेः- केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला महिला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने आणि सार्थक वेलफेअर फौंडेशनच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन आज उमा खापरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर सार्थक वेलफेअर फौंडशनच्या संचालिका स्वाती नामजोशी, पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे,
देआसरा( Persistent) फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले, पुणे महानगर पालिकेच्या समाज कल्याण समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना गगे,
सार्थक वेलफेअर फौंडशनच्या मृणाल राजहंस, पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा वृषाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना उमा खापरे म्हणाल्या की, महिलांमध्ये मूळतःच उद्योजिकीतेचे बीज असते. परंतु, काही वेळेस सांसारिक जबाबदारीमुळे किंवा काही वेळा परिस्थितीमुळे त्या बीजाची वाढ खुटंते. परंतु, त्या महिलेच्या मनातील उद्योजिकेच्या बीजाला सकारात्मक संगोपन, मशागत मिळाल्यास ते अंकुर फुलून येते. परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद ठेवणा-या या महिला अशक्य ते शक्य करून दाखवत आहेत, अशी अनेक उदाहरणे समाजात दिसून येतात. शून्यातून सुरूवात करून करोडोंची उलाढाल करणा-या अनेक उद्योजिका महिला आपल्याला सभोवताली दिसून येतात. देशाच्या विकासात महिलांचा उद्योजकतेच्या माध्यमातून सक्रीय सहभाग वाढल्यास त्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरतील. महिला उद्योजिकेला प्रेरणा देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आणि सवलती आहेत. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था महिला उद्योजिकांसाठी उत्पादन, प्रक्रीया, पॅकिंग, विपणन अशी प्रशिक्षण शिबीरे राबवतात. या योजना आणि प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घ्यावा. जग खूप मोठे असून उद्योगाच्या अनेक संधी बाजारात उपलब्ध आहेत. महिलांनी योग्य ती संधी निवडून, बाजारपेठ निवडून त्या संधीचे सोन्यात रूपांतर करावे. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संपूर्ण महाराष्ट्रातील एनजीओंचे एक जाळे निर्माण करून एकमेकांच्या संधी आणि सेवांच आदान प्रदान करता येईल.

यावेळी बोलताना प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या की, आजही महिला स्वओळखीसाठी झगडत आहेत. परंतु, त्याच महिलेने उद्योजकतेची कास धरली तर तिला समाजात मान, प्रतिष्ठा आणि चेहरा प्राप्त होतो. महिलांच्या स्वप्नांना पंख दिले पाहिजे. उद्योजकतेमधूनच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी केले. यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा घेतला. स्वाती नामजोशी यांनी पुस्तक निर्मिती मागील संकल्पना विशद केली. मृणाल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: