महाराष्ट्र विद्यालय कर्मयोगी लोकांची निर्मिती – डॉ. सदानंद मोरे

  • महाराष्ट्र विद्यालय शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : “राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी रुजवली. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र या त्रिसूत्रीचा अवलंब करायला ते सांगत. राष्ट्रीय शिक्षण देणे गरजेचे आहे, हे त्यावेळीच्या विद्वान लोकांच्या लक्षात आले आणि विविध शिक्षण संस्था स्थापन झाल्या. त्या काळात व्यावसायिक शिक्षणाची गरज होती. तेंव्हाची गरज ओळखून व्यावसायिक शिक्षणासाठी महाराष्ट्र विद्यालय चालू झाले. कर्मयोगी लोकांनी निर्माण केलेली ही संस्था आहे. ध्येय ठेवून वाटचाल केल्यामुळे संस्थेने १०० वर्ष उत्कृष्ट कार्य केले आहे. पुढील कार्यकाळातही प्रगतीचा आलेख असाच चढता राहायला हवा,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

पुणे विद्यार्थी गृह संचालित महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. सहकारनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुक्ता टिळक, उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, पंडित वसंतराव गाडगीळ, विद्यालयाचे संस्थापक डॉ. ग. श्री. अण्णासाहेब खैर यांच्या स्नुषा विजयाताई खैर, नियामक मंडळाच्या सदस्य पौर्णिमा लिखिते, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक प्राचार्य हणमंत भोसले, राजेंद्र कडुसकर, कृष्णाजी कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, अमोल जोशी, दिनेश मिसाळ, माजी संचालक म. न. देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णुदास गावडे यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदाशिव पेठेतील संस्थेच्या आवारात कुलगुरू दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास हार घालून महोत्सवाची सुरवात झाली. प्रसंगी महाराष्ट्र विद्यालयाच्या नवीन वेबसाईटचे अनावरण डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “ही संस्था सुरु झाली त्यावेळी मुबलक संधी होत्या. त्यामुळे जो शिकेल, तो मोठा व्हायचा. पायाभूत सुविधा, संसाधने कमी असल्याने मुलांना दानशूरांकडे वार लावून किंवा माधुकरी मागून शिकावे लागे. अशा काळात ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही संस्था आहे. दादासाहेब केतकर, डॉ. ग. श्री. तथा अण्णासाहेब खैर, नानासाहेब परुळेकर अशांसारख्या कर्मयोगीनी त्याकाळी समर्पित भावनेने हे कार्य उभारले. हीच समर्पित भावना पुढील शंभर वर्षातही राहावी. कौशल्याचे, व्यावसायिकतेचे, स्वावलंबनाचे शिक्षण देण्याची ही परंपरा यापुढेही चालू राहावी. आज समाजात अनेक धंदेवाईक शिक्षणसंस्था आहेत. अशावेळी पुणे विद्यार्थी गृहाने वेगळे स्थान निर्माण केल्याचे दिसून येते.”

प्रास्ताविकात सुभाष जिर्गे म्हणाले, “महाराष्ट्र विद्यालय म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी उभारलेली चळवळ आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कृत व स्वावलंबी करण्याचे व्रत विद्यालयाने जपले आहे. संस्थेतून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपले नाव उंचावत आहेत. या संस्थेमध्ये माणूस घडवला जातो, याचा अभिमान वाटतो.” संस्थेची वाटचाल सांगताना प्रा. राजेंद्र कांबळे म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृहाच्या स्थापनेनंतर १२ वर्षांनी महाराष्ट्र विद्यालय सुरु झाले. राष्ट्रीय विचारांची जोपासना, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण येथे दिले जाते. तंत्र व औद्योगिक शिक्षण, नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाते. हे विद्यालय विद्वानांना घडवणारी एक चळवळ आहे.” शिक्षिका राजश्री कसबे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णुदास गावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: