कोरोना – राज्यात रविवारी १६ हजार ६२० नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीयत. कारण दिवसेंदिवस सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १६ हजार ६२० रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. काल १५ हजार ६०० रुग्ण सापडले होते. आज या संख्येत हजार रुग्णांनी वाढ झाल्याने राज्यातील चिंता अधिक गडद होत जातेय.

राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता विविध शहरांत आणि जिल्ह्यांत लॉकडाऊन लावण्यात येत आहे. तसेच, अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादले जात आहेत. मात्र, शहरी भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग घेतला आहे. आज ठाण्यात ३२८ नवे रुग्ण सापडले असून कल्याण-डोंबिवलीत ४०४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, पुण्यात १ हजार ७४० रुग्णांची नोंद झाली आहे. अर्थात ही आकडेवारी राज्याला लॉकडाऊनच्या अधिक जवळ नेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच लॉकडाऊनबाबत कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास राज्यात कडक लॉकडाऊन लागू शकतो.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १६ हजार ६२० नवे रुग्ण सापडले तर ८ हजार ८६१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २१ लाख ३४ हजार ७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, सध्या १ लाख २६ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: