Wednesday, June 17, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ विचारवंत व काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे निधन

पुणे, दि. १३ – पुरोगामी चळवळीचे अग्रणी योध्दा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्य शोधक समाजाचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत कॉग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे आज शनिवार १३ मार्च रोजी दुपारी १.२० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.

मूळचे बामणी येथील रहिवासी असलेले साळवे मागील अनेक वर्षापासून सिव्हील लाईन प्रभागात मुलगा अ‍ॅड. जयंत साळवे व कुटूंबियांसोबत वास्तव्याला होते. वृध्दापकाळाने त्यांची आज दुपारी प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, एक मुलगा, ३ मुली, सून, नातू, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर रविवार १४ मार्च रोजी बामणी येथे सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

३० मार्च १९३० रोजी एका गरीब शेतकरी कुटूंबात एकनाथराव यांचा जन्म झाला. बालपणापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपुरात घेतले. त्यानंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ची पदवी घेतली. शिक्षक म्हणून नोकरी करतांनाच एल.एल.बी. केले. त्याच काळात त्यांची नागपुरात कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन यांच्याशी मैत्री झाली. परंतु नागपुरमध्ये न राहता चंद्रपुरात येऊन त्यांनी वकीली व्यवसाय सुरू केला. १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाने एकनाथराव यांना चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर ते पुन्हा १९७२ मध्ये आमदार म्हणून विजयी झाले. मात्र १९७८ मध्ये त्यांचा पराभव झाला.

दरम्यान याच काळात एकनाथराव यांनी १९६७ मध्ये राजुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची स्थापना केली. पुढे बल्लारपूर येथे याच नावाने हिंदी, उर्दू, तेलगु भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या एकनाथराव यांनी १९९३ मध्ये बौध्द धम्माचा स्विकार केला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेव्हा आत्राम यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका करण्यात एकनाथराव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

लेखक असल्यामुळे साहित्यिक, कवींच्या वर्तुळातही एकनाथराव यांची बैठक होती. ‘एन्काऊंटर’, ‘मी बौध्द धम्म का स्विकारला’ या शिवाय इतर पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. वकीली व्यवसाय करतांना अनेक दिनदुबळे, दलित, आदिवासी, गरीबांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री हंसराज अहीर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. गोडसेंच्या घरात गांधी विचार पोहचविण्याची त्यांची शेवटी इच्छा होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading