भास्कराचार्यांनी गणितात रंजकता आणली – डॉ सुधाकर आगरकर
थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावर मासिक वेबिनार मालिकेस प्रारंभ
पुणे : गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला . फल ज्योतिष ऐवजी गणित ज्योतिष्यावर त्यांनी भर दिला .ग्रहणाबद्दलची भीती घालवली .गणित मनोरंजक रित्या मांडले .गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली,हे योगदान अभूतपूर्व आहे ‘,असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले .
‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावरील वेबिनार मध्ये ते बोलत होते .
‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांच्या मासिक वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पहिले व्याख्यान सत्र पार पडले . १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनार मालिकेचा दुसरा भाग सादर होणार आहे . वर्षभर हा उपक्रम दरमहा दुसऱ्या शनीवारी, दुसऱ्या रविवारी चालणार आहे.
आजच्या वेबिनारमध्ये प्राची साठे यांनी प्रास्ताविक केले . मंदार नामजोशी,पराग गाडगीळ ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट आदी सहभागी झाले .
डॉ सुधाकर आगरकर म्हणाले ,’ परदेशात ब्राझील पासून अनेक ठिकाणी भास्कराचार्याच्या गणित सूत्राचा उल्लेख होतो . देशात देखील हा अभ्यास व्हायला हवा .’ भास्कर प्रथम ‘ हे सातव्या शतकात होऊन गेले . त्रिकोणमिती मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे . त्यांच्या नावाने भारताने उपग्रह सोडलेला आहे . तर भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले . गणित आणि खगोलशास्त्रात त्यांनी योगदान दिले . त्यांच्याही नावे उपग्रह सोडण्यात आला . वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी सिद्धांत शिरोमणी ग्रंथ लिहिला . गणितासारख्या रुक्ष विषय त्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला .
फल ज्योतिष ऐवजी गणित ज्योतिष्यावर त्यांनी भर दिला .ग्रहणाबद्दलची भीती घालवली .गणित मनोरंजक रित्या मांडले .गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली .उदाहरणे सोडविण्यासाठी आवडेल ती पद्धत निवडण्याची मुभा त्यांनी विद्यार्थ्यांना ,वाचकांना दिली . भास्कराचार्य यांच्यानंतर भारतीय गणिताची अधोगती झाली . पुढे जगात भास्कराचार्यांच्या लिखाणावर संशोधन सुरु झाले .
जळगावच्या पाटण येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणिताची ‘भास्कर नगरी ‘ उभारण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती डॉ आगरकर यांनी दिली .
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने ‘ अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली. आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने वेबिनार मालिकेतून उलगडत आहे.
आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला,असेही नामजोशी यांनी सांगितले.
