Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 10 : मराठी भाषेचे विद्यापीठ राज्यात स्थापन करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने भाषा सल्लागार समितीच्या पुणे येथे १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीने ठराव पारित केला आहे. वर्धा येथे हिंदी भाषेचे विद्यापीठ, आंध्रात तेलुगू विद्यापीठ तर अन्य प्रांतात संबंधित भाषेची विद्यापीठे आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे अशी शिफारस करण्यात आल्याचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले.

महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या शिफारशी व ठरावाचा आढावा घेऊन भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, भाषा विद्यापीठाचे संकुल, प्रशासकीय यंत्रणा, शैक्षणिक विभाग, भाषा प्रयोगशाळा, विद्यापीठाची केंद्रे, कर्मचारी वर्ग, न्यायालयीन कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर, प्रशासन व नवतंत्रज्ञानात मराठीचा वापर इत्यादी बाबींवर शिफारस करण्यासाठी राज्य शासन लवकरात लवकर समिती गठीत करेल. राज्यात मराठीला शोभेल असे देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्थापन करेल. यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे श्री.सामंत यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading