समाजातील सकारात्मकतेचे स्पंदन टिपणे हे विद्यापीठाचे आद्य कर्तव्य – डाॅ. नितीन करमळकर

पुणेः- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे केवळ शैक्षणीक उपक्रम चालवणारे केंद्र नसून व्यापक अर्थाने हे विद्यापीठ समाजाशी नाळ जोडून आहे. समाजातील सकारात्मकतेचे स्पंदन टिपणे हे पुणे विद्यापीठाचे आद्य कर्तव्य आहे, असे मत सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे देण्यात येणा-या सावित्रीबाई फुले सन्मानाचे वितरण आज कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी शीला बारसे, कडूबाई खरात, सोनिया अगरवाल-कोंजेटी, अॅड. वर्षा देशपांडे, क्षिप्रा रोहित आणि रेलु वसावे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई फुले सन्मान देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाची सन्मानाची शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शोध समिती अध्यक्षा आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या सुनेत्रा पवार, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डाॅ. संतोष परचुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर म्हणाले की, समाज उत्थानाच्या कार्यात महिलांनी वेळोवेळी मोठे योगदान दिलेले आहे. तत्कालीन काळात चरित्र लिहण्याची प्रथा नसल्याने या स्त्रियांचे कार्य काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले. त्यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविण्यात मर्यादा आल्या. 1939 साली लिहिलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या चरित्राची एक प्रत मला नुकतीच मिळाली असून त्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लवकच पुनर्प्रकाशन करण्यात येईल. महिलांचे हे कार्य प्रेरणादायक असून ती प्रेरणा आजच्या तरूण-तरूणीपर्यंत पोहोचली पाहिजे.

प्र-कुलगुरु डाॅ. एन.एस.उमराणी म्हणाले की, संशोधन आणि ज्ञान विस्तार यांचे संचित समाजापर्यंत नेणे, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्य आहे. स्त्रीयांकडे मूलतःच उद्यमशीलता असते. या उद्यमशील महिलांना योग्यवेळी मदतीचा हात आणि मार्गदर्शन लाभल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलली 5 ट्रिलीयनची अर्थव्यवस्था उभी राहण्यास वेळ लागणार नाही. मुलभूत संशोधनाबरोबर मानव्याचा ध्यास हा आपला पाया आहे. 

 व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले की, समाजातील कर्तृत्ववान महिलांची दखल घेऊन त्यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यासपीठावर सत्कार करणे, हा गौरवाचा भाग आहे. पुरस्कारांच्या माध्यमातून काम करणा-या महिलांचे मनोबल आणखी वाढणार आहे. 

यावेळी पुरस्काऱर्थींनीं देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डाॅ. संतोष परचुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: