फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने महिला शक्तीचा जागर
पुणे, दि. ९ – मुलींच्या कौशल्यांना विकसित करत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यातील बीटी सहानी स्कूलच्या ‘गर्ल्स हू बिल्ड रोबोट्स’ या ‘रोबोटिक्स इंडिया’च्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य दिले.
या संकल्पनेची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून यातून मुलांची कृत्रिम बुद्धीमत्ता, यांत्रिक शिक्षण, स्टीम एज्युकेशन रोबोटिक्सच्या माध्यमातून विकसित होते. मुलांच्या भविष्यातील कौशल्यांचा प्रभावीपणा यामुळे लहान वयातच वाढविण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत फ्लो पुणेद्वारा २०० मुलींना कोडींग, आर्टीफिशियल इंटेलिजन्स, आयओटी आणि रोबोटिक्स शिकण्यासाठीचे आवश्यक साहित्य कीट पुरविण्यात आले.
रोबोटिक्स इंडियाच्या संचालक पायल राजपाल म्हणाल्या, “रोबोटिक्स शिक्षण हे भविष्यातील उत्पादकतेकडे नेणारा महत्वपूर्ण माध्यम ठरणार आहे तसेच यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्टीम माइंड (STEAM-minded education) शिक्षणाचा दृष्टीकोन प्राप्त होतो. हे विद्यार्थी कोडींग, ए.आय., रोबोटिक्स, आयओटी असे विविध विषय यात शिकतात. त्यामुळे रोबोटिक्सच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण, अग्रगण्य व वैविध्यपूर्ण समाजाशी जोडले जातात.”
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस म्हणाल्या, “आम्हाला आनंद आहे की या उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि कल्पनांच्या क्षेत्रात तरुण मुलांच्या विचार प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल घडवणारे व्यासपीठ आम्ही उभारू शकत आहोत.”
याशिवाय हमारा बचपन ट्रस्टच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंट भागातील महिलांसाठी ‘जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या ३५० महिलांना फ्लो पुणे चॅप्टरतर्फे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक वाटण्यात आले.
डॉ. सणस म्हणाल्या, “या ३५० महिलांपैकी १०२ महिला आधीच एवढ्या कुशल आहेत कि त्यांना लगेच रोजगार मिळून त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात.”
