सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्यामुळे स्त्रियांना समाजात वेगळे स्थान-उपमहापौर सरस्वती शेंडगे

पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, किरण बेदी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे समाजात स्त्रियांना वेगळे स्थान निर्माण झाले. चूल-मुल सांभाळत या स्त्रियांनी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. स्त्रिया आहेत, म्हणून पुरुष उत्तमरितेने आपले काम करु शकतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक महिलेने आदर्श घ्यायला हवा, असे मत पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले. 

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते. यावेळी जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा कसबेकर, संचालिका अ‍ॅड. गौरी कुंभोजकर, नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे, मृणाली रासने, वैशाली खटावकर, स्वप्नाली पंडित, सुनीता चौहान, दिक्षा माने, विशाखा पवार, चंद्रमा भंडारी, हिना साखरिया, रोहिणी हांडे, स्वाती ओतारी, अभिनेत्री वाळके, मनाली देसाई आदी उपस्थित होते. 


महिला व्यावसायिक लता हगवणे, वर्षा ढमाले, रोहिणी इंगळे, डिंपल ठक्कर, वंदना ललवाणी, उज्वला कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. शाल, फळांची परडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते. 
मृणाली रासने म्हणाल्या, गृहिणी असो वा नोकरी करणारी स्त्री, कोणतीही स्त्री कमी नाही. महिला ही आदिशक्ती असते. प्रत्येक पतीच्या मागे स्त्री ची खंबीरपणे साथ असते. स्वत:पेक्षा स्त्रिया इतरांसाठी झटत असतात. त्यामुळे स्त्रियांना योग्य मान मिळायला हवा. अ‍ॅड.गायत्री खडके म्हणाल्या, महिलांचा सन्मान झाल्याना त्यांना लढण्याची ताकद, प्रेरणा व उत्साह मिळतो. त्यामुळे केवळ एकाच दिवशी नाहे, तर दररोज स्त्रियांविषयी आदर ठेऊन त्यांचा सन्मान करायला हवा.

डॉ. मधुरा कसबेकर म्हणाल्या, आरोग्य व आर्थिकदृष्टया महिला सक्षम होणे गरजेचे आहे. आज समाज बदलत आहे. अनेक क्षेत्रात महिलांना प्राधान्य दिले जात आहे. नोकरदार महिलांप्रमाणे किंवा त्यापेक्षाही जास्त गृहिणी काम करतात, त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. प्रतिक्षा शेंडगे म्हणाल्या, व्यापारी वर्गातील महिलांना प्रोत्साहन व आधार मिळणे गरजेचे आहे. आज पोलीस खात्यात देखील महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. महिला सशक्त असल्या, तरी देखील त्यांना समाजाच्या पाठिंब्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: