फ्लेम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभा केला १४ लाख रुपयांचा निधी

पुणे – कोविड साथीच्या काळात फ्लेम युनिव्हर्सिटीच्या एस.ए.सी.टी. (सपोर्ट अ कॉज टीम) या विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलेल्या उपक्रमाची सांगता ग्रामीण भागातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी क्राउडफंडिंग अभियानाच्या माध्यमातून १४ लाख रुपयांहून अधिक निधीच्या उभारणीतून झाली. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अत्यंत मागास आदिवासी पट्ट्यातील पारली गावातील मुलांसाठी हा निधी उभारण्यात आला. साथीच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे या भागातील लहान मुलांना आसपासच्या ब्रुअरीजमध्ये कामासाठी पाठवले जात होते. मुलींची परिस्थिती तर आणखी दुर्दैवी आहे, कारण त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांचे लहान वयात लग्न करून दिले जाते.

मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या श्री राज एज्युकेशनल सेंटर या स्वयंसेवी संस्थेला फ्लेम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी पुढे होऊन मदत केली. त्यांनी फ्युएलअड्रीमच्या सहयोगाने क्राउडफंडिंग अभियान राबवून मुलांसाठी निधी उभा केला. हे अभियान २५ दिवस सुरू होते आणि त्यात ४० जण सहभागी झाले होते. टीमने १०,८०,००० रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते पण अखेरीस त्यांनी १४,४२,२०८ रुपये एवढा निधी उभा केला. अभियानातून उभा राहिलेला पैसा वंचित मुलांना जेवण, शिक्षण, गणवेश, स्टेशनरी, वाहतुकीच्या सुविधा, ई-लर्निंग, कम्प्युटर प्रशिक्षण, क्रीडासुविधा, आरोग्य तपासणीची सुविधा पुरवण्यासाठी वापरला जाणार आहे.

फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू दिशान कामदार म्हणाले,“आमच्या विद्यार्थ्यांनी इतरांसाठी उदाहरण ठरेल अशी सामाजिक प्रतिसादक्षमता व पारलीतील वंचित मुलांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे उद्यमशील चैतन्य दाखवले याचा आम्हाला अभिमान आहे. याचा पारलीतील मुलांना सध्याच्या आव्हानात्मक काळात खरोखर उपयोग होईल. विद्यार्थ्यांना वर्गापलीकडे शिक्षण घेण्याच्या संधी मिळाव्यात यावर फ्लेम युनिव्हर्सिटीचा भर असतो. आमचे विद्यार्थी विविध समुदायाशी निगडित उपक्रमांमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना देशाच्या सामाजिक व आर्थिक वास्तवाचे जवळून दर्शन घडते व त्याबद्दल समजही निर्माण होते. भविष्यकाळात व्यापक कल्याणामध्ये योगदान देऊ शकतील असे जबाबदार आणि सहानुभूतीशील नागरिक म्हणून त्यांना घडवण्याची आमची इच्छा व उद्दिष्ट आहे.’’

फ्लेम युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी व एस.ए.सी.टी.ची सदस्य आहना नायर म्हणाली,“प्रत्येक मुलाला शिक्षणाचा व अधिक चांगल्या आयुष्याचा हक्क आहे असे मला वाटते. १,००० हून अधिक मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करेल अशी रक्कम क्राउडफंडिंगद्वारे यशस्वीरित्या उभी करण्याचा अनुभव खरोखर समाधान देणारा आहे.”

फ्लेम युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आणि एस.ए.सी.टी.चा सदस्य अरुण रवी म्हणाला,“या अभियानाने मला खूप काही शिकवले आणि त्याचा भाग होता आला याचा मला खूप आनंद वाटतो. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यात मदत करणाऱ्या अभियानात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी फ्लेम युनिव्हर्सिटी आणि माझ्या टीम सदस्यांचे आभार मानतो.”

गेल्या वर्षी एस.ए.सी.टी.ने ६३२ ग्रामीण स्त्रियांना ‘वॉटर व्हील्स’ पुरवण्यासाठी १५.८ लाख रुपयांचा निधी उभा केला होता. वॉटर व्हील्स हा मातीच्या घड्यांना एक आधुनिक व सोयीस्कर पर्याय असून, त्यामध्ये सुमारे ४५ लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असते व तिला चाके असतात. हा उपक्रम खूपच प्रभावी ठरला. यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना कमीत-कमी प्रयत्नांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्याची मुभा मिळाली. यामुळे वेळ व ऊर्जा दोहोंची बचत झाली. ग्रामीण भागातील पाणी भरणे या कामाचे स्वरूपच यामुळे बदलून गेले.

एसएसीटीचे प्रमुख कार्य हे जनतेच्या आयुष्यांवर प्रभाव टाकणारे व्यापक सामाजिक उपक्रम हाती घेणे हे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: