भक्तीरसात न्हाहली सांज

संगीत संगोष्टी या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप

पुणे, दि. ७ – अभिजात शास्त्रीय संगीतातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व कर्नाटकी शास्त्रीय संगीत या दोहोंचा गोडवा पुणेकर रसिकांना एकाच मैफलीत अनुभवायला मिळाला. आवाजातील गोडवा, गायकीतील तजुर्बा आणि भावपूर्ण स्वरांमधील कन्नड भजनांनी ही सांज भक्तीरसात न्हाहली. निमित्त होते ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे.

‘स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा दोन दिवसीय कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. संगीताचा प्रचार, प्रसार या उद्देशाने नव्यानेच सुरू झालेल्या ‘स्वरमंडल फाऊंडेशन’चा हा शुभारंभाचा कार्यक्रम होता.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायक आदित्य खांडवे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीने मैफलीची सुरुवात करत विलंबित तीनतालात ‘हां रे मन काहे को सोच करे रे…’, दृत एकतालमध्ये ‘कुंजन में रचो रास…’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर राग भूप सादर करत विलंबित तिलवाडा ‘जब मै जानी तेहारी बात…’ या रचनेसह पेश केला. त्यानंतर दृत तीनतालात ‘खेलत अत धूमधाम..’ ही बंदिश सादर केली. त्यांनी मैफलीचा समारोप राग बसंतमध्ये मध्य लय तीनतालातील बंदिश व तरानाने केला. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आरोही मुळे व ऋजुता कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पं. अनंत तेरदाल यांनी कन्नड रचना पेश केल्या. त्यांनी प्रसिद्ध कन्नड अभंग ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’, ‘निन्न नोडी धन्य नादे ना..’, ‘इंदू एनगे श्री गोविंदा..’, ‘नीने अनाथ बंधो..’, हरे बेंकटा शैल वल्लभा…’, ‘करूणिसो रंगा करूणिसो…’, ‘कशी मोहिनी घातले गुरूने…’, ‘कंगळीड्यातको कावेरी रंगन नोडदा…’ हे कन्नड अभंग सादर करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आनंद टाकळकर (टाळ), संजीव तेरदाल (गायन साथ) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: