fbpx

क्राउड फंडींगद्वारे नव संशोधकांच्या स्वप्नांना मिळाले बळ

सीएस प्राईड या आत्याधुनिक ड्रोन निर्मितीला मिळाला चार लाखांचा प्रोत्साहन निधी

पुणे – जेएसपीएम कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सीएस प्राईड  आत्याधुनिक ड्रोनला व्हर्टेक्सच्या स्टार्टअप क्राउड फंडींग प्लॅटफॉर्मद्वारे तब्बल चार लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ड्रोन तयार करण्यासाठी कॉलेजच्या ६ जणांच्या टीमने एकत्रित काम केले. कॉलेजच्या तरुणांच्या कल्पक विचारांनी या ड्रोनची निर्मिती केली. एकी हेच बळ म्हणत विज्ञान आणि तंत्रज्ञानातून सामाजिक बदलांना दिशा दिली. व्हर्टेक्सतर्फे तनवीर इनामदार, केतकी टकले,  वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया आणि रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्नेहा सुभेदार यांच्या हस्ते या निधीचे वितरण झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना इनामदार, अ‍ॅटॉक्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद गोरे, व्हर्टेक्सचे ताहीर इनामदार उपस्थित होते. यावेळी तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमावेळी मिळाले.

सेलेब्रोस्पार्कचे संस्थापक गणेश थोरात आणि मिहीत केदार यांनी या ड्रोनच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. या दोघांनीही क्राऊडफंडिंग मोहिमेचा अनुभव उपस्थितांना सांगितला. व्हर्टेक्सच्या माध्यमातून 40 दिवसांच्या कालावधीत त्यांचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ४ लाख रुपयांचा निधी जमा केला. तसेच व्हर्टेक्सएक्सच्या मार्गदर्शनाखाली मे २०२१ मध्ये त्यांचे ड्रोन सीएस-प्राइड बाजारात दाखल होतील असा विश्वास यावेळी गणेश थोरात यांनी व्यक्त केला.

रविंद्र धारिया म्हणाले की, युवकांच्या नवनवीन कल्पनेवर आधारित उद्योग हे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे फक्त नोकरी न करता युवा पिढीने उद्योजकतेकडे वळले पाहिजे. ‘गुणवत्ता आणि क्षमता असेल तर निधी उभारण्यात अडचणी येत नाहीत. जगभरातून भरपूर निधी उपलब्ध असून तो मिळवण्यासाठी आपले स्टार्टअप कसे वेगळे आहेत हे पटवून देणे गरजेचे आहे. उद्योजकता विकास करण्याकरिता आपणामध्ये सतत शिकून घेण्याची वृत्ती असली पाहिजे व कामामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी उदयोजकाकडे असावे लागणारे गुणधर्म यावर मार्गदर्शन केले.

व्हर्टेक्सचे तन्वीर इनामदार म्हणाले कि, एकी हेच बळ किंवा लोकसहभागातून प्रगती असे तात्पर्य सांगणाऱ्या अनेक कथा ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहे. माणसांचा कर्ताकरविता जमाव एकत्र येतो, तेव्हा त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा समाजात शाश्वत बदल करण्याची क्षमता बाळगते. यालाच म्हणतात प्रभावी आणि परिणामकारक लोकसहभाग. आज क्राउड फंडींग ही एकप्रकारची सेवा झाली आहे आणि अशा सेवा देणा-या असंख्य वेबसाईट जगभरात कार्यरत आहेत. नावीन्यपुर्ण काम करणा-यांना या वेबसाईट मदत करत असतात. व्हर्र्टेक्स हे भारतातील पहिले क्राउड फंडींगसाठी नावाजलेले व्यासपीठ आहे. आपल्यातील गुणवत्तेला आर्थिक हातभार देण्यासाठी सोशल मिडीयावर सातत्याने विविध प्रकल्पांचे सतत आयोजनही करत असतात.

स्नेहा सुभेदार म्हणाल्या की, देशाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी नाविण्यपुर्ण गोष्टी करायला हव्यात. तरुणांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. कोणत्याही एका चौकटीत राहून साचेबद्ध शिक्षण घेणे आणि त्याच क्षेत्रात पुढे करिअर करण्यापेक्षा तरुण वेगळ्या वाटेवर वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळत आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून अभिनव उपक्रम आजची तरुणाई करत असल्याचा विशेष आनंद होत असल्याची भावना यावेळी स्नेहा सुभेदार यांनी व्यक्त केली. 

Leave a Reply

%d bloggers like this: