संगीत ही ईश्वरीय कला आहे – शाल्मली जोशी

पुणे, दि. ६ – “भारताच्या महत्वपूर्ण परंपरांपैकी एक अत्यंत महत्वाची परंपरा ही संगीत कलेची आहे. संगीताची निर्मिती निसर्गातूनच झाली. ती एक ईश्वरीय कला आहे. त्यामुळे या अमूर्त कलांचा’ निजीध्यास घेऊनच ईश्वर चरणी ती सेवा अर्पण करायची असते.” असे मत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांनी व्यक्त केले.  

‘स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात होत आहे. संगीताचा प्रचार, प्रसार या उद्देशाने नव्यानेच सुरू झालेल्या ‘स्वरमंडल फाऊंडेशन’चा हा शुभारंभाचा कार्यक्रम आहे. यावेळी त्या बोलत होत्या.
पहिला दिवस ज्येष्ठ गायक पं. चिंतुबुवा म्हैसकर व पं. रत्नाकर पै यांच्या शिष्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांच्याशी चर्चा व गायन याने रंगला. यावेळी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, “निसर्गात अनेक नाद असतात. मात्र त्यातील कर्णमधुर नाद म्हणजे स्वर असतात. या स्वरांतील अनुशासनातून रागांची निर्मिती झाली. रागाची एक चौकट उभी राहते. ही कला स्व-अनुभव, स्व-शिक्षण आणि स्व-प्रयत्नांनी अभिरुची संपन्न करावी लागते. जेंव्हा स्वतःला विसरून केवळ त्या स्वरांमध्ये हरवतो तेंव्हा तो स्तर प्रज्ञेचा असतो. त्यातूनच ईश्वराला जे ऐकायचे ते तो आपसूकच आपल्याकडून गाऊन घेतो.”

“जोड राग गाताना दोन्ही रागांमधील सामायिक स्तर अभ्यासपुर्णपणे शोधून त्यात शिरकाव करावा लागतो. तो राग सादर करताना त्यांच्या सामायिक सौंदर्याबरोबरच ते दोन राग ही ओळखता यावेत असे सादरीकरण असायला हवे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

त्यांनी जोड राग ‘मालीगौरा’ने गायनाची सुरुवात केली. राग पुरिया व राग गौरी यांचे मिश्रण असलेल्या या रागात विलंबित तीन तालात ‘सरस भेद जुग सरस…’ ही रचना तर ‘तू हर हार रब समान..’ ही द्रुत बंदिश पेश केली. स्वरांवरील प्रभुत्व व धीरगंभीर सुरांनी मैफलीत चैतन्याची लहर पसरली. त्यानंतर राग रागेश्री मधील ‘धन धन भाग…’, ‘झनन झनन बाजे…’ या रचना सादर केल्या. राग परजमधील ‘अखियाँ मोरी लाग रही…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. ‘पवन चलत..’ ही द्रुत बंदिश सादर केली. त्यानंतर सादर केलेल्या ‘नादिर दिर दानी…’ या तराण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मौफालीचा समारोप त्यांनी ‘खेले कान्हाई…’ या होरीने केला.  
यावेळी त्यांचे पुत्र तेजोवृष जोशी (तबला) व मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पौलवी देशमुख, मेघना साठे, डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे (तानपुरा व गायनसाथ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद देशमुख यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: